Ladki Bahin Yojana eKYC Scam Alert : सावधान! लाडकी बहीण योजनेची eKYC करताय? रिकामं होईल बँक खातं, मोठा स्कॅम समोर..,

Beneficiaries warned against fake e-KYC websites in Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य केली आहे. ई-केवायसी करण्यासाठी सरकारकडून दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. यामुळे मोठ्या संख्येने महिला ऑनलाइन ईकेवायसी करत आहेत. पण त्याचवेळी अनेक खोट्या वेबसाइट्स तयार झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे बँक खाती रिकामी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

महिला व बालविकास मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात ईकेवायसी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. राज्यातील २६ लाखांहून अधिक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं पुढे आल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यात पुरुषांनीही महिलांच्या नावाने लाभ घेतल्याचं सांगितलं जातं आहे.

या योजनेसाठी पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊनच ईकेवायसी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे. कारण लाडकी बहिणीच्या ई-केवायसीच्या नावावर अनेक खोट्या वेबसाईट तयार झाल्या आहेत. लाडकी बहीण योजनेची ईकेवायसी असं गुगलवर सर्च केल्यास, hubcomut.in नावाची वेबसाईट समोर येते आहे.किंवाच अशाच अनेक चुकीच्या व फेक वेबसाईट समोर येत आहे, या वेबसाईटवर माहिती भरल्यास तुमचं खासगी माहिती किंवा बँक खातं रिकामं होण्याची भीती आहे.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अपात्र व्यक्तींना योजनेतून वगळण्यासाठी, योग्य लाभार्थी महिलांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी, सरकारी योजनांमध्ये पारदर्शिता राखण्यासाठी आणि भविष्यात डिजिटल सत्यापनाद्वारे इतर योजनांचा लाभ घेणे सोपे होण्यासाठी, ही ईकेवायसी महत्त्वाची ठरणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारने जुलै 2024 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा या मागचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत 21 ते 65 वयाच्या महिलांना प्रती महिना १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते आहे. हे पैसे थेट महिलांच्या खात्यात जमा होतात. सध्या 2.25 कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.

ई-केवायसीची प्रोसेस काय?

१) मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी

https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

२) मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल.

३) या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे.

४) यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही. जर आधीच पूर्ण झाली असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल. जर पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल.

५) जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल.

६) यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा. संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करावे. OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटणावर क्लिक करावा.

७) त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील:

  • माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
  • माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे.

८) वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे.

९) शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.

Leave a Comment