POCRA Anudan Yojana 2026 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध (POCRA Yojana) अनुदान योजना उपलब्ध आहेत, ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करतात, उदाहरणार्थ, ठिबक सिंचनासाठी ७५% पर्यंत अनुदान दिले जाते, ज्यामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर सुनिश्चित होतो.
पोकरा अनुदान योजना (POCRA Yojana):
हवामान बदलाचा राज्याच्या शेतीवर विपरीत परिणाम दिसून येत असून, भविष्यात देखील सदर परिणामांची व्याप्ती वाढणार असल्याचे राज्याच्या हवामान बदला विषयक कृती आराखडयामध्ये नमूद केले आहे. मराठवाडा व विदर्भातील शेतक-यांना गेल्या काही वर्षांपासून मोठया दुष्काळास सामोरे जावे लागत असून भू-गर्भातील पाणीसाठयावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी शेतीमधील पिकांची उत्पादकता घटत आहे. तसेच पूर्णा नदीच्या खो-यातील भू-भाग हा निसर्गतः क्षारपड असल्याने शेतीसाठी सिंचनास मर्यादा येत आहेत.
या प्रतिकूल परिस्थीती मध्ये अल्पभू-धारक शेतक-यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थीतीशी जुळवून घेण्यास शेतक-यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA Yojana) सुरु करण्यात आलेला आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत खालील विविध पोकरा अनुदान योजना (POCRA Yojana) राबवल्या जातात.
१) पंप संच व पाईप अनुदान योजना:
राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीची संरक्षित सिंचनाच्या माध्यमातून उत्पादकता वाढवण्यासाठी यापूर्वी विविध योजनामधून अनुदानावर संरक्षित सिंचन सुविधा राबविण्यात आलेल्या आहेत व येत आहेत. त्यामुळे शेतक-यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. सद्यस्थितीत राज्यातील टंचाईग्रस्त परिस्थिती पाहता व शेतक-यांकडे पिकास संरक्षित सिंचन देणेकरिता व्यवस्था निर्माण करण्यासाठी जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत (POCRA Yojana) संरक्षित सिंचनाकरिता पाण्याची उपलब्धता या उपघटकांतर्गत पाणी उपसा साधने (पंप संच) व पाईप (एच.डी.पी.ई./पी.व्ही.सी.) हे वैयक्तिक लाभाचे घटक राबववणे प्रस्तावित आहे
लाभार्थी निवडीचे निकष :
१. प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषी संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेले अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना, अनु. जाती/जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल.
Financial Planning & Management
२. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे, परंतु पाणी उपसा साधना अभावी पीक उत्पादनात घट येते अशा शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा.
३. पाणी उपसा साधने उपलब्ध असलेले तसेच या घटकाचा इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ देय नाही.
अर्थसहाय्य:
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणी उपसा साधने अंतर्गत विदयुत पंप संच /डिझेल इंजिन व पाईप (Pipe Grant Scheme) साहित्य घटकासाठी अनुज्ञेय अनुदानाचा तपशील खालीलप्रमाणे;
पंप संच /डिझेल इंजिन अनुदान :
- जास्तीत जास्त अनुदान मर्यादा : 75 %
- जास्तीत जास्त अनुदान रक्कम (Rs.): 15000
पाईप अनुदान – (Pipe Grant Scheme):
- जास्तीत जास्त अनुदान मर्यादा : 75 %
- जास्तीत जास्त अनुदान रक्कम (Rs.): 22500
अंमलबजावणीची कार्यपद्धती: अंमलबजावणीतील विविध स्तरावरील जबाबदाऱ्या:
१.इच्छुक शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या https://dbt.mahapocra.gov.in संकेत स्थळावर समूह सहाय्यकाच्या मदतीने नोंदणी करून अर्ज करावा. तसेच आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावीत.
२.मार्गदर्शक सूचनानुसार दिलेल्या तांत्रिक निकषाप्रमाणे साहित्य खरेदी करणे बंधनकारक राहील.
३.लाभार्थ्याने आवश्यक यंत्र सामुग्री उपलब्ध करुन घेण्याची जबाबदारी त्या लाभार्थ्याची राहील. तसेच कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम (अग्रीम ) मिळणार नाही.
४.निवडलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार सेवा पुरवठादार संस्थानकडून पंप संच व पाईप (Pipe Grant Scheme) खरेदी करण्याची मुभा राहणार आहे.
५.साहित्य प्रकल्प स्थळी पुरवठा झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्वसाक्षांकित करावीत व ऑनलाईन अनुदान मागणी करावी.
६.उपविभागीय व विभागीय कृषी अधिकारी यांनी ऑनलाईन पूर्वसंमती दिल्यानंतर घटकाची प्रत्यक्ष अंमलबजावणी- मांडणी व जोडणी करावी. सेवा पुरवठादार संस्थेकडील बिले शेतकऱ्याने स्वत:ची स्वाक्षरी करून ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे.
पंप संच व पाईप अनुदान (Pipe Grant Scheme) योजनेच्या अधिक माहिती करिता :- इथे क्लिक करा.
२) परसातील कुक्कुटपालन योजना:
कुक्कुटपालन हा शेतीस पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जातो. ग्रामीण भागातील परसातील कुक्कुटपालनाद्वारे शेतकऱ्यांना व भूमिहीन कुटुंबातील लाभार्थ्यांना हमखास पूरक उत्पन्नाचे साधन उपलब्ध झालेले आहे.
उद्देश:
1. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये (POCRA Yojana) समावेश करण्यात आलेल्या गाव समूहामधील भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, अनुसूचित जाती/जमाती मधील महिला शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सक्षम बनविणे.
2. ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा, परितक्त्या महिला व घटस्फोटीत महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे.
3. ग्रामीण भागातील परसातील कुक्कुटपालन व्यवसायास चालना मिळावी व लाभार्थी कुटुंबाना प्रथिनेयुक्त आहार मिळावा.
लाभार्थी निवडीचे निकष:
प्रकल्पाांतर्गत निवड केलेल्या गावातील ग्राम कृषी संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेले भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा , परितक्त्या महिला, घटस्फोटीत महिला, अनुसूचित जाती/जमाती मधील महिला शेतकरी यांना लाभ देय राहील.
अर्थसहाय्य:
सदर देशी वाणांच्या कोंबडीची चार आठवडे वयाची पिल्ले घेणे अभिप्रेत आहे. चार आठवडे वयाच्या पिलाची रक्कम रु. 100/- प्रती पक्षी मर्यादेत निर्धारित करणेत येत आहे. एका पिलाच्या निवाऱ्यासाठी 1 चौ.फुट जागा आवश्यक आहे. एका लाभार्थ्यास जास्तीत जास्त १०० पक्षांसाठी अर्थसहाय्य देय आहे. जुने पक्षी असतील तर जुने व नवीन मिळून एकूण १०० पक्षी होतील या मर्यादेपर्यत नवीन पक्षांची खरेदी करता येईल. नव्याने खरेदी केलेल्या पक्षांसाठी व त्यांच्या निवाऱ्यासाठीच अनुदान देय राहील. या घटकांतर्गत ५० किंवा ५० पेक्षा जास्त पक्षी खरेदी करणे अनिवार्य आहे. निवाऱ्यासाठी रु. ७०/- प्रती चौ.फुट प्रमाणे मापदंड असून आवश्यकता असल्यास लाभार्थ्याने स्वत:च्या जागेवर स्वत:चे अथवा बाजारातून साहित्य उपलब्ध करून निवाऱ्याची सोय करावयाची आहे.
खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी प्रकल्प खर्चाच्या ५०% व अनुसूचीत जाती/जमातीतील लाभार्थ्यांसाठी प्रकल्प खर्चाच्या ७५% अनुदान देय आहे. एका लाभार्थ्याने १०० पक्षी खरेदी करून निवाऱ्याची सोय केल्यास पक्षी खरेदीसाठी रु. १००००/- व निवाऱ्यासाठी रु. ७०००/- खर्चाच्या मापदंड आहे. त्यानुसार खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यासाठी एकूण खर्च रु. १७०००/- च्या ५०% म्हणजेच रु. ८५००/- तर अनुसूचित जाती/जमातीतील लाभार्थ्यांसाठी ७५% म्हणजेच रु. १२७५०/- अनुदान देय आहे. मापदंडाव्यतिरिक्त जादाचा खर्च लाभार्थ्याने स्वत: करावयाचा आहे. या घटकासाठी अर्ज केलेल्या परंतु अदयाप पक्षी खरेदी न केलेल्या लाभार्थ्यांना वरीलप्रमाणे अर्थसहाय्य देय राहील.
२०२१ सुधारित अनुदान खालीलप्रमाणे:
- जास्तीत जास्त अनुदान मर्यादा : 75 %
- जास्तीत जास्त अनुदान रक्कम (Rs.): 12750
अंमलबजावणीतील विविध स्तरावरील जबाबदाऱ्या:
लाभार्थी:
१. इच्छुक लाभार्थीने घटकांतर्गत बाबींचा लाभ घेण्यासाठीचा प्रकल्पाच्या https://dbt.mahapocra.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करावा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
२. पूर्वसंमती मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत पक्षी खरेदी करून ऑनलाईन अनुदान मागणी करावी.
३. निवडलेल्या लाभार्थीने ग्राम कृषी संजीवनी समिती स्तरावर गठीत खरेदी समितीच्या उपस्थितीत पक्षी खरेदी करावी.
४. पक्षी खरेदी स्थानिक बाजारामध्ये करून ज्या गावातील बाजारात पक्षी खरेदी केली आहे त्या ग्रामपंचायतीची पक्षी खरेदी बाबतची तपशिलासह पावती सादर करणे आवश्यक आहे. लाभार्थीच्या पसंतीनुसार दिलेल्या मापदंडानुसार देशी वाणाची पिल्ले ही स्थानिक पुरवठादाराकडून / अंडी उबवणी केंद्राकडून ग्राम कृषी संजीवनी समिती स्तरावरील पक्षी खरेदी समिती समवेत खरेदी करू शकतो.
५. पक्षांसाठी आवश्यक आकारमानाच्या निवाऱ्याची सोय स्थानिक अथवा बाजारातून साहित्य घेऊन करावयाची आहे.
६. परसबागेतील (Parsatil Kukkutpalan Yojana) कुक्कुटपालन या घटकांतर्गत अनुदान मिळणेसाठी ऑनलाईन मागणी करावी. सोबत खरेदी देयकांच्या मूळप्रती व खरेदी समितीने प्रमाणपत्र लाभार्थ्याने स्व:साक्षांकित करुन ऑनलाईन अपलोड कराव्यात.
७. पक्षी खरेदीनंतर वाहतुकीचा खर्च लाभार्थीने स्वत: करावयाचा आहे.
परसातील कुक्कुटपालन (Parsatil Kukkutpalan Yojana) योजनेच्या अधिक माहिती करिता :- इथे क्लिक करा.
३) नवीन विहीर योजना:
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (POCRA Yojana अंतर्गत) नवीन विहीरी योजनेची माहिती घेणार आहोत. या योजनेत ग्राम कृषि संजिवनी समितीने मान्यता दिलेले शेतकरी सहभागी होऊ शकतात.
आवश्यक कागदपत्रे: सातबारा (7/12) व 8अ उतारा
आवश्यक कागदपत्रे:
- सातबारा (7/12)
- 8अ उतारा
लाभार्थी पात्रता:
१. विहीर घेण्यासाठी एकूण जमिनीचे क्षेत्र ०.४० हेक्टर पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे
२. संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध असलेले तसेच या घटकाचा इतर कोणत्याही योजनेतून यापूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ देय नाही.
३. प्रस्तावित नवीन विहीर व पिण्याच्या पाण्याचा सार्वत्रिक स्त्रोत यातील अंतर ५०० मीटर पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
४. प्रस्तावित विहीर व अस्तित्वात असलेल्या इतर विहिरींचे अंतर १५० मीटर पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
५. गावामधील अस्तित्वातील व प्रस्तावित असे एकूण सिंचन विहिरींची घनता लागवडी योग्य क्षेत्राच्या ८ विहिरी प्रति चौरस किलोमीटर असणे आवश्यक आहे.
६. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
७. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या व्याख्येप्रमाणे अतिशोषित व शोषित पाणलोट क्षेत्रामध्ये विहिरी घेण्यास मनाई आहे.
८. नवीन विहीर खोदणे व अन्य बाबींची पूर्तता करण्यासाठी कमाल १ वर्षाचा कालावधी अनुज्ञेय आहे.
अर्थसाहाय्य:
नवीन विहीर (Vihir Yojana) योजनेसाठी १०० टक्के रुपये २.५० लाख. अनुदान थेट लाभार्थीच्या आधार कार्ड संलग्न बँक खात्यावर जमा करण्यात येते.
ऑनलाईन अर्ज कुठे करावा? (Vihir Yojana Apply)
इच्छुक शेतकऱ्यांनी https://dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
अधिक माहिती करिता :- इथे क्लिक करा.
४) विहीर पुनर्भरण योजना:
जमिनीवरील पाण्याचा साठा व भूजलसाठा हे पाण्याचे दोन्ही साठे प्रामुख्याने पावसावरच अवलंबून आहेत. पाऊसमान चांगले असल्यास जमिनीवरील पाणीसाठे उदा. धरणे, शेततळी, तलाव इत्यादी तसेच पाणी जिरल्यामुळे भूजलसाठ्यात वाढ होते. लोकसंख्या वाढ, शहरीकरण, औद्योगिकीकरण, जमीन व पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, पाणी वापरासंबंधी साक्षरतेचा अभाव, जास्त पाणी लागणाऱ्या पिकांखालील क्षेत्रात होत असलेली वाढ, भूजल पुनर्भरणासाठीचे अपुरे प्रयत्न, नैसर्गिकरीत्याही भूजल पुनर्भरण कमी होणे , दुष्काळी परिस्थितीमुळे भूजलाची वाढलेली मागणी या व अशा कारणांमुळे भूजलपातळी खोल गेलेली आहे. ज्या प्रमाणात भूजलाचा उपसा करण्यात येत आहे, त्या प्रमाणात भूजलाचे पुनर्भरण होत नाही, त्यामुळे भूजल पातळी दिवसेंदिवस खोल गेलेली आहे. भूजल पातळी वाढवण्यासाठी पावसाचे पाणी जिथे जिथे शक्य आहे, त्या ठिकाणी जिरविण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहेच, सोबतच उपलब्ध असलेल्या भूजलाचा काटकसरीने व शास्त्रीय पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे
लाभार्थी निवडीचे निकष:
१. प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषी संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेल्या अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना, अनु. जाती/जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात यावा .
२. ज्या विहिरी बंद पडलेल्या आहेत तसेच ज्यांची पाण्याची पातळी खोल गेलेली आहे, अशा शेतकऱ्यांना प्राधान्यक्रमाने लाभ देण्यात येईल .
३. या घटकाचा इतर कोणत्याही योजनेतून पूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा लाभ देय नाही.
अंमलबजावणीची कार्यपद्धती : अंमलबजावणीतील विविध स्तरावरील जबाबदाऱ्या –
लाभार्थी
१. इच्छुक शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या https://dbt.mahapocra.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करावी व आवश्यक कागदपत्रासहित ऑनलाईन अर्ज सादर करावा.
२. मार्गदर्गक सूचनेमध्ये दिलेल्या तांत्रिक निकषाप्रमाणे साहित्य खरेदी करणे बंधनकारक राहील.
३. आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करुन घेण्याची जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची राहील. तसेच कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम (अग्रीम) मिळणार नाही.
४. निवडलेल्या लाभार्थीना त्यांच्या पसंतीनुसार अनुभवी व्यक्ती /संस्थेकडून सदरचे काम करण्याची मुभा राहणार आहे.
५. काम पूर्ण झाल्यानंतर देयके व आवश्यक कागदपत्रे स्वसाक्षांकित करून ऑनलाईन अनुदान मागणी करावी.
६. उपविभागीय कृषी अधिकारी यांनी ऑनलाईन पूर्वसंमती दिल्यानंतर घटकाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी.
५) गोड्या पाण्यातील मत्स्यपालन अनुदान योजना:
राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेती क्षेत्रामध्ये संरक्षित सिंचनाकरिता प्रामुख्याने विहिरी, पाझर तलाव, गावतळी, वैयक्तिक/सामुदायिक शेततळी याद्वारे पाणी उपलब्ध करून घेतले जाते. उपलब्ध सिंचनस्तोताचा पिकांसाठी संरक्षित सिंचनाबरोबर शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून गोड्या पाण्यातील मत्स्यशेती करण्यासाठी वापर केल्यास, शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. त्या अनुषंगाने जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत (POCRA Yojana) एकात्मिक शेती पद्धती (A2.5) या घटकांतर्गत शेत तळ्यात गोड्या पाण्यातील मत्स्यपालन (A5.5) हा उपघटक वैयक्तिक लाभाच्या घटकांमध्ये समाविष्ट केलेला आहे.
लाभार्थी निवडीचे निकष:
१. प्रकलपांतर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषी संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेले अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना, अनु.जाती/जमाती, महिला ,दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल.
२. ज्या शेतकऱ्यांकडे संरक्षित सिंचनाची सोय, सामुदायिक शेततळे किंवा वैयक्तिक शेततळे आहे,अशा शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा.
३. मत्सशेती अंतर्गत घटकाचा इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ देय नाही.
४. पाण्याचा साठा किमान आठ ते दहा महिने असणे आवश्यक आहे.
५. मत्सपालन करण्यासाठी तलाव हे शक्यतो आयताकृती असावेत, ज्यामुळे मासे पकडण्यासाठी जाळे फिरवणे सोयीचे जाते.
६. तलावाची खोली किमान १.२ मी ते २ मीटर असणे आवश्यक आहे.
इच्छुक शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या https://dbt.mahapocra.gov.in संकेत स्थळावर समूह सहाय्यकाच्या मदतीने नोंदणी करून अर्ज करावा. तसेच आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावीत.
गोड्या पाण्यातील मत्स्यपालन अनुदान (Godya Panyatil Matsyapalan PoCRA Yojana) योजनेच्या अधिक माहिती करिता :- इथे क्लिक करा.
६) हरितगृह/शेडनेटगृह उभारणी योजना:
फलोत्पादन क्षेत्रात संरक्षित शेती पध्दतीचा अवलंब केल्याने फुलपिके व भाजीपाला पिकाचे अधिक उत्पादन, उत्पादकता व उच्च दर्जाचे उत्पादन मिळून शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होते. फुलपिके ,भाजीपाला व रोपवाटीकांसाठी शेतकरी हरितगृह, प्लास्टिक टनेल, शेडनेटगृह इत्यादींचा वापर करतात. हरितगृह व शेडनेटगृहाच्या वापरामुळे फुले व भाजीपाला पिकांचे योग्य गुणवतेच्या मालाचे उत्पादन होत असून त्यापासून शेतकऱ्यांना कमी क्षेत्रामध्ये अधिक चांगले उत्पादन मिळत असल्यामुळे हरितगृह व शेडनेटगृह शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत करतात
योजनेचा उद्देश:
I. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आलेल्या 15 जिल्ह्यातील निवडलेल्या गाव समूहातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनविणे.
II. शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या व उच्च प्रतीच्या निर्यातक्षम पिकांच्या लागवडीसाठी आर्थिक सहाय्य करणे .
III. ग्रामीण भागातील युवकांना कृषी क्षेत्रात स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे.
IV. फलोत्पादन क्षेत्रात बिगर हंगामी पिके घेण्यासाठी व उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे
लाभार्थी निवडीचे निकष:
1. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी (एकूण भूधारणा २.०० हे. पर्यंत ) या घटकासाठी पात्र राहतील.
2. यापूर्वी शासनाच्या इतर योजनामधून या घटकाचा लाभ घेतलेला असल्यास एकत्रित लाभ ४० गुंठ्याच्या मर्यादेत देता येईल.
अंमलबजावणीतील विविध स्तरावरील जबाबदाऱ्या:
लाभार्थी शेतकरी
1. इच्छूक शेतकऱ्यांनी प्रकल्पाच्या https://dbt.mahapocra.gov.in या संकेतस्थळावर किंवा DBT APP द्वारे नोंदणी करून ऑनलाईन अर्ज सादर करावा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
हरितगृह/शेडनेटगृह उभारणी (Shednetgruh Yojana) योजनेच्या अधिक माहिती करिता :- इथे क्लिक करा.
७) मधुमक्षिका पालन योजना:
मधमाशांचे पालन व्यवस्थित केले आणि त्यापासून मिळणारा मध एकत्रित करून तो बाटल्यात भरून विकला तर एक एकर शेतात ठेवलेल्या मधमाश्यांच्या पेट्यातून वर्षाकाठी ५० हजार ते ६० हजार रुपयांचा मध जमा होऊ शकतो. मध हे एक शक्तिदायक, पौष्टीक अन्न व औषध आहे. मधमाशांचे मेण हे सौंदर्य प्रसाधने तसेच औद्योगिक उत्पादनाचा घटक आहे. केवळ मध व मेणासाठीच नव्हे तर मधमाशांकडून होणाऱ्या परागीकरणामुळे उत्पादनात चांगल्या प्रमाणात वाढ होते.
त्यामुळे प्रकल्प क्षेत्रामध्ये मधुमक्षिका पालनाद्वारे शेतकऱ्यांना पूरक उत्पन्न मिळवून देण्यासाठी तसेच ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी (POCRA Yojana) प्रकल्पातंर्गत “मधुमक्षिका पालन ” या घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे.
लाभार्थी निवडीचे निकष:
प्रकल्पातंर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषी संजीवनी समितीने (VCRMC) लाभार्थी निवडताना भूमिहीन व्यक्ती, अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांमधील अनुसूचित जाती, जमाती, महिला, दिव्यांग व सर्वसाधारण शेतकरी या प्राधान्यक्रमाने लाभार्थ्यांची निवड करावी.
अंमलबजावणीतील विविध स्तरावरील जबाबदाऱ्या:
लाभार्थी
1. इच्छुक लाभार्थीने घटकांतर्गत बाबींचा लाभ घेण्यासाठी प्रकल्पाच्या https://dbt.mahapocra.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून अर्ज आवश्यक कागदपत्रासह अपलोड करावा.
2. निवडलेल्या लाभार्थीने गठीत खरेदी समितीच्या उपस्थितीत मधुमक्षिका वसाहत, संच व मध काढणी यंत्र इत्यादींची खरेदी करावी.
3. पूर्वसंमती मिळाल्या पासून एक महिन्याच्या आत मधुमक्षिका व इतर आवश्यक बाबींची खरेदी करून ऑनलाईन अनुदान मागणी करावी.
4. मधुमक्षिका पालनासाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक राहील.
5. मधुमक्षिका पालन या घटकांतर्गत अनुदान मिळणेसाठी ऑनलाईन मागणी उपविभागीय कृषी अधिकारी यांचेकडे करावी. सोबत खरेदी देयकांच्या मूळप्रती व खरेदी समितीचे प्रमाणपत्र लाभार्थ्याने स्व:साक्षांकीत करुन ऑनलाईन अपलोड करावे.
अधिक माहिती करिता :- इथे क्लिक करा.
८) गांडूळ खत /नाडेप / सेंद्रिय निविष्ठा उप्तादन युनिट योजना:
सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये निसर्ग संवर्धन करणे , पीक उत्पादनाचा खर्च कमी करणे, रासायनिक खते, कीटकनाशके ,तणनाशके व संप्रेरके या सारख्या घातक रसायनांचा पर्यायी अशा सेंद्रिय व जैविक निविष्ठाचा वापर वाढविणे हि काळाची गरज आहे. गांडूळ खत किंवा व्हर्मी कंपोस्ट हे शेतीतील काडी कचरा,वनस्पतीजन्य पदार्थ ,शेण यांच्यापासून गांडुळादवारे बनविले जाते. गांडूळ खतामध्ये विविध जिवाणू ,संजीवके व्हिटॅमिन आणि इतर उपयुक्त रसायने गांडूळ खतामध्ये असल्याने त्याच्या पिकाच्या वाढीवर चांगला परिणाम होतो .
याच बरोबर शेतातील कचऱ्यावर कंपोस्टिंग द्वारा प्रक्रिया केल्यास त्यातील सेंद्रिय पदार्थ जैविक पद्धतीने ,सूक्ष्म जीव तसेच गांडुळादवारे कुजून त्यापासून उत्तम प्रकारचे ह्यूमस सारखे सेंद्रिय कंपोस्ट खत तयार होते. या खताचा वापर शेतात मोठ्या प्रमाणात केला गेल्यास जमिनीचे आरोग्यात विशेष सुधारणा होऊन, कृषी उत्पादनात फार मोठी भर पडेल. शेतातून निघालेल्या सर्व वनस्पतीजन्य पदार्थापासून सेंद्रिय खत तयार करून,परत शेतात टाकणे हि काळाची गरज आहे. सेंद्रिय खतामुळे जमिनीचा कस व जलधारणा शक्ती वाढून पोषक द्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो. जमीन भुसभुशीत राहते. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते. शेतात उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंची वाढ होण्यास मदत होते. या अनुषंगाने सदरची बाब विचारात घेऊन गांडूळ खत उत्पादन युनिट आणि नॅडेप कंपोस्ट उत्पादन युनिट व सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट हे वैयक्तिक लाभाचे घटक राबविणे प्रस्तावित आहे.
लाभार्थी निवडीचे निकष:
- प्रकल्पातंर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषी संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेले अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना, अनु. जाती/जमाती, महिला , दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात यावा.
- ज्या शेतकऱ्याकडे गांडूळ खत उत्पादन युनिट , नॅडेप कंपोस्ट उत्पादन युनिट व सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट उभारण्याकरिता जागा उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा.
- ज्या शेतकऱ्याकडे गांडूळ खत उत्पादन युनिट, नॅडेप कंपोस्ट उत्पादन युनिट व सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट उभारल्यानंतर ते व्यवस्थित सुरु राहण्यासाठी किमान दोन पशुधन उपलब्ध आहेत, अशा शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा.
- इतर कोणत्याही योजनेतून या घटकाचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत पुन्हा लाभ देण्यात येऊ नये.
पोकरा अंतर्गत ऑनलाईन अर्ज करा – Apply Online Gandul Khat Yojana:
इच्छुक शेतकऱ्यांनी https://dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
अर्थसहाय्य:
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत राबविण्यात येणाऱ्या गांडूळ खत उत्पादन युनिट, नाडेप कंपोस्ट उत्पादन युनिट व सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट हे वैयक्तिक लाभाचे घटकासाठी अनुज्ञेय अनुदानाचा तपशील माहिती करिता :- इथे क्लिक करा
९) शेततळे योजना:
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (POCRA Yojana) अंतर्गत शेततळे अनुदान योजने मध्ये खालील घटक सहभागी होऊ शकतात.
(१) प्रकल्प गावातील अल्प/अत्यल्प भूधारक शेतकरी यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ७५ टक्के अर्थसहाय्य देय आहे.
(2) २ ते ५ हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ६५ टक्के अर्थसहाय्य देय आहे.
लाभार्थी पात्रता:
शेतकरी यांचेकडे किमान 0.60 हे.जमीन असावी. यापूर्वी इतर योजनांच्या माध्यमातून शेततळे/सामुहिक शेततळे/बोडी या घटकाचा लाभ घेतलेला नसावा.
उद्दिष्टे:
१. प्रकल्पातंर्गत निवडलेल्या गाव समुहा मधील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परीस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनविणे.
२. संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करणे.
३. दुबार पिकाखालील क्षेत्र वाढविणे व शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ करणे.
लाभार्थी निवडीचे निकष :
१. प्रकल्पातंर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषि संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेले अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना, अनु. जाती/जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल.
२. निवडलेल्या आकारमानाच्या शेततळ्यासाठी तांत्रिक निकषानुसार योग्य जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे.
३. शेततळ्याचे अस्तरीकरण या घटकासाठी इतर कोणत्याही शासकीय योजनेतून अथवा शेतकऱ्याने विहित आकारमानानुसार स्वत: इनलेट आउटलेट विरहित शेततळे केले असल्यास अस्तरीकरण या घटकासाठी शेतकरी पात्र राहील.
शेतकऱ्याच्या जागा निवडीसाठी तांत्रिक निकष:
शेततळ्यासाठी जागेच्या निवडीबाबत निकष खालीलप्रमाणे राहतील.
१. शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर क्षेत्र असावे.
२. ज्या जमिनीतून पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे अशी जमीन असलेल्या जागेची निवड करावी.
३. काळी जमीन ज्यात चिकण मातीचे प्रमाण जास्त आहे अशा जमिनी शेततळ्यास योग्य असल्याने अशा जमिनीची निवड करण्यात यावी.
४. मुरमाड व वालुकामरय सच्छिद्र खडक असलेली जागा शेततळ्याकरता निवडू नये.
५. क्षेत्र उपचाराची कामे झालेल्या पाणलोट क्षेत्रात शेततळी प्राधान्याने घेण्यात यावीत.
६. शेततळ्याच्या क्षमतेनुसार आवश्यक पाणलोट क्षेत्र असल्याची खात्री करावी.
७. नाल्याच्या /ओहोळाच्या प्रवाहात शेततळे घेण्यात येऊ नये.
८. इनलेट/आऊटलेट सहित शेततळ्यासाठी पाणलोट क्षेत्रातून येणारे पाणी हे शेततळ्याच्या पाणीसाठा क्षमतेपेक्षा जास्त असणे बंधनकारक राहील.
९. इनलेट/आऊटलेट विहिरीत शेततळ्यासाठी पाणी पुनर्भरणासाठी स्त्रोत असल्याची खात्री करण्यात यावी. या बाबी विचारात घेवून शेततळ्याचा प्रकार निवड करावा.
१०. लाभार्थी शेतकऱ्याची जमीन इनलेट आउटलेटसह शेततळ्याकरिता तांत्रिक दृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहे, जेणेकरून पावसाचे वाहून जाणारे पाणी शेततळ्यामध्ये साठवणे अथवा पुनभरण करणे शक्य होईल.
११. इनलेट आऊटलेटसह शेततळे यासाठी लाभार्थी निवडताना पाणलोट क्षेत्रातून वाहून येणारा अपधाव हा शेततळ्याच्या आकारमानापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तसेच, पाणलोट क्षेत्रातून वाहून येणारा अपधाव हा नैसर्गिकरित्या शेततळ्यात येणे आवश्यक आहे याची प्रथम खात्री करावी.
शेततळे योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज कुठे करावा?
इच्छुक शेतकऱ्यांनी https://dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
अधिक माहिती करिता – इथे क्लिक करा.
१०) रुंद वाफा व सरी पेरणी यंत्र (बीबीएफ यंत्र) अनुदान योजना:
प्रकल्पांतर्गत प्रत्येक गावातील शेतकऱ्यांपर्यंत रुंद वाफा व सरी (बीबीएफ) हे तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी शेतीशाळा, प्रशिक्षण, अभ्यास दौरे, कार्यशाळा, तांत्रिक साहित्य इ. माध्यमातून प्रसार करण्यात येत आहे. शेतीशाळा या माध्यमातून खरीप हंगामात गावांमध्ये रुंद वाफा व सरी या पद्धतीने बीबीएफ यंत्राच्या साहाय्याने पेरणी केलेली आढळून आलेली आहे. सदर तंत्रज्ञान अवलंब करताना काही अडचणी देखील येत असल्याबाबत प्रक्षेत्र भेटीमध्ये शेतकरी आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. यामध्ये बीबीएफ यंत्राची उपलब्धता, बीबीएफ यंत्र वापरणेबाबत कौशल्य, बीबीएफ यंत्राची किंमत, बीबीएफ यंत्राची जोडणी, यंत्राची देखमाल इ. बाबी समाविष्ट आहेत. तथापि सदर तंत्राची उपयुक्तता लक्षात घेता त्याचा अवलंब वाढवणे क्रमप्राप्त आहे त्यासाठी सदर उपक्रम प्रकल्पामध्ये समाविष्ट करण्यात येत आहे.
संपर्क :
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, ३० A/B आर्केड, वर्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई-४००००५
संकेतस्थळ : https://mahapocra.gov.in
ईमेल : mahapocra@gmail.com / pmu@mahapocra.gov.in
फोन : 022 – 22163351